शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१० डिसेंबर) ;- शिवसेनेचे संपर्क नेते सचिन आहिर यांनी अगोदर शहरात फेरफटका मारुन किंवा पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मध्ये संचालक असलेल्या त्यांच्याच शिवसेनेच्या सदस्याला विश्वासात घेऊन स्मार्ट सिटीच्या कामाबाबतची माहिती घेतली असती तर त्यांना पत्रकार परिषद घेऊन भाजपावर खोटे नाटे आरोप करण्याची वेळ आली नसती.
यावर बोलताना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांच्यासह शासनामधील प्रधानसचिव दर्जाचे अधिकारी अध्यक्ष आहेत. शिवाय आय.ए.एस. / आय.पी.एस दर्जाचे अधिकारी संचालक आहेत. शिवसेना नेते सचिन आहिर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना फक्त येऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुका डोळयासमोर ठेवुन त्यांनी फक्त बिनबुडाचे आरोप करण्याची स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन आम्ही शहराचे पुढच्या तीस वर्षाचे नियोजन करुन शहर विकासाची कामे मार्गी लावत आहोत. यावर शहरातील जनतेचा निश्चितच आमच्यावर विश्वास आहे. आणि याच विश्वासाच्या जोरावर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येणार यांचा अचुक अंदाज आल्यामुळे शिवसेनेच्या व विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकली आहे. यांच्याकडे आरोप करण्यासाठी कसलाही मुददा नाही केवळ स्टंटबाजी करण्यासाठी आता बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सचिन आहिर यांनी पत्रकार परिषदेत आम्ही पाच वर्षात केलेली पाच कामे दाखवावीत असा आरोप केला आहे. खरंतर ज्यांना आपले दहा नगरसेवक निवडुन आणता येत नाही त्यांनी अशी विचारणा करावी म्हणजे हे हास्यास्पद आहे.
आतातर राज्यामध्ये तुमचेच आघाडी सरकार आहे. तुमच्या सरकारने या दोन वर्षामध्ये पूर्ण केलेली दहा कामे सांगावीत. आम्ही तुमच्या सरकारचा भर चौकामध्ये जाहिर सत्कार व अभिनंदन करु. असा उपरोधी सवाल सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला.