शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ डिसेंबर) :- संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पारंपारिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत या स्पर्धेवरती गेली ११ वर्षापासून बंदी आली होती. परंतु दिनांक १६.१२.२०२१ रोजीच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सदरील स्पर्धेला सशर्त परवानगी मिळाली आहे. या बैलगाडा शर्यती म्हणजे ग्रामीण भागातील शेतक-यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व पारंपारिक असा धार्मिक खेळ आहे. या स्पर्धावरती ग्रामीण भागातील अर्थकारण मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामधील प्रत्येक गावामध्ये विशेष करून समाविष्ट गावांमध्ये बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी पूर्वीपासून बैलगाडा घाटअस्तित्वात आहेत आणि आता परवानगी मिळाल्यानंतर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, परंतु गेली ११ वर्ष या बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे सदरील बैलगाडा घाटांची दुरावस्था झालेली आहे. सदरील घाट हे स्पर्धा घेण्यायोग्य राहिलेले नाहीत. प्रत्येक गावामधील घाटाची डागडुजी दुरुस्ती आपल्याकडील उपलब्ध निधी मधून करावी तसेच येणा-या बजेट मध्ये बैलगाडा घाटाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी असे आदेश महापौर यांनी महापालिका प्रशासनास दिले. महापौर माई ढोरे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.
यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, क्रिडा समिती सभापती प्रा.उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, नगरसदस्य संतोष लोंढे, राजेंद्र गावडे, नगरसदस्या सिमा सावळे, आशा शेंडगे, सुलक्षणा धर, माजी नगरसदस्य शांताराम भालेकर, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आनंदा यादव, बैलगाडा मालक अजित बुर्डे, चेतन जाधव, अतुल बोराटे, राहुल सस्ते, निखिल बो-हाडे, तुषार सस्ते, गोटया भाऊ फुले, विनायक मोरे आदि उपस्थित होते.