शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ डिसेंबर) :- संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीला माननीय सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील समाविष्ट गावांमधील बैलगाडा घाटाची दुरुस्ती व्हावी, याकरिता माजी महापौर विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले, दिलेल्या निवेदनात नगरसेवक राहुल जाधव यांनी नमूद केले आहे. की,संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पारंपारिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत या स्पर्धेला गेली अकरा वर्षापासून बंदी होती.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सदरील स्पर्धेला सशर्त परवानगी मिळाली आहे .बैलगाडा शर्यती म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचा व पारंपारिक असा धार्मिक खेळ आहे. या स्पर्धेवरती ग्रामीण भागातील अर्थकारण मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते, त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरांमधील प्रत्येक गावांमध्ये विशेष करून समाविष्ट गावांमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी पूर्वीपासून बैलगाडा घाट अस्तित्वात आहे आणि आता परवानगी मिळाल्यानंतर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल परंतु गेली अकरा वर्षे या बैलगाडा शर्यती बंदी असल्यामुळे सदरील बैलगाडा घाटांची दुरावस्था झाली आहे. सदरील घाटे स्पर्धा घेणे योग्य राहिलेले नाही प्रत्येक गावांमधील घाटाची डागडुजी दुरुस्ती करणे आवश्यक आहे, तरी सर्व बैलगाडा घाट हे दुरुस्त करावे अशी मागणी माजी महापौर व विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली.
त्यांच्या या मागणीची दाखल घेत झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आपल्याकडील उपलब्ध निधीमधून सदर बैलगाडा घाटाची दुरुस्ती करावी तसेच येणाऱ्या बजेट मध्ये बैलगाडा घाटांचे विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी असे आदेश महानगरपालिका प्रशासनास दिले.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगर सदस्य राजेंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.