शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ डिसेंबर) :- शेतकरी वर्गासाठी जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने दि. १६/१२/२०२१ रोजी सशर्त परवानगी दिलेली आहे. यात गावातील वार्षिक उत्सवाकरीता बैलगाडा शर्यत घेण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील गावठाण परिसरातील नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी तळवडे प्रभाग क्रमांक 12 येथील बैलगाडा घाट महापालिकेच्यावतीने तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे नगरसेवक पंकज भालेकर यांनी केली आहे.
तळवडे गाव येथे पुर्वीपासुन दरवर्षी श्री भैरवनाथ महाराज यात्रेच्या उत्सवामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. तळवडे गावाच्या गायरान जागेत फार पूर्वीपासुनचा बैलगाडा घाट आहे. सन २०११ पासुन बैलगाडा शर्यतीस बंदी असल्यामुळे सदर घाटाची दुरावस्था झालेली आहे. त्यामूळे या घरासाठी सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात घाट व परिसराच्या नुतनीकरणाच्या कामाचा भरीव तरतुदीसह समावेश करावा.
तळवडे गावाची यात्रा दरवर्षी कालाष्टमी दिवशी ( माहे एप्रिल) महिन्यात असते. यावर्षी बैलगाडा शर्यतीवरील बंदी मा. सर्वोच्च न्यायालयाने उठविली असल्याने बैलगाडा शर्यती होणार आहेत. त्यामुळे सदर बैलगाडा घाटाची दुरुस्ती करावी लागणार आहे. या घाटाची महापालिकेच्या चालू कामांतुन तात्काळ दुरुस्ती करणेत यावी, तसेच सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकामध्ये बैलगाडा शर्यतीच्या घाटाचे व परिसराचे नुतनीकरण करणेच्या कामासाठी भरीव तरतुद करावी. असे नगरसेवक पंकज भालेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.