शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२२डिसेंबर) :- दळवीनगर आणि भोईरनगर येथील रस्त्यावर कायम वर्दळ असते. भोसरी आणि हिंजवडी येथे आणि कॉलेजला जाण्यासाठी रस्त्यावर कायम गर्दी असते. पण येथे ‘बस थांबा’ च नाही. निगडीच्या दिशेने जाणाऱ्या बसला गेले १५ वर्षे बस स्टॉपच नाही. बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. जेष्ठ नागरिक आणि विध्यार्थी उन्हातान्हात, पावसात बसची वाट पाहत असतात.
त्यात येथील रस्ता ६० फुटांपेक्षा जास्त रुंद असल्याने आणि रस्त्याला दुभाजक नसल्याने वाहने भरधाव असतात. त्यामुळे बसची वाट पाहत रस्त्यावर उभे असणाऱ्यांना अपघात होण्याचा धोका उद्भवतो.
यासाठी राष्ट्रवादी पदवीधारचे शहर अध्यक्ष माधव धनवे पाटील यांनी थेट ‘पुणे महानगर परिवहन मर्यादित महामंडळ’ चे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेतली.
यावेळी मिश्रा यांनी आश्वासन देत लवकरात लवकर बस थांबा उभारण्यात येईल असे सांगितले.
प्रभाग १७ आणि प्रभाग १९ मध्ये हा रस्ता येत असल्याने येथील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे असे माधव पाटील यावेळी म्हणाले.