निवडणुकीत विरोधकांची हवा घालवा ; भोसरीतील गाव जत्रा मैदानातून लांडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ डिसेंबर) :-
महापालिकेतील सत्ताधारी भष्ट्राचार करून पैसे खात आहेत. मनापासून, लोकांना फसवून ते पैसे खात आहेत. किती खावे याचे भान देखील त्यांना नाही. शहरात कुठेही जावा सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. महापालिकेची सत्ता ज्यांच्या हातात दिली, ते भस्मासुर आपल्या खिशात हात घालून पैसे खाण्याचे काम करत असल्याचा सणसणीत टोला, माजी आमदार विलास लांडे यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला. त्यांची भष्ट्राचाराची हि नस आता शहरातील नागरिकांनी ओळखली आहे. त्यामुळे शहर वाचवायचे असेल तर खा. शरद पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दादा हे चांगल्या विचारांनी काम करत आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला द्यावी, असे आवाहन माजी आमदार लांडे यांनी केले. विरोधकांनी काही दिवस हवा केली. आता त्यांची हवा काढायची आहे. त्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाहिजे, असे देखील लांडे म्हणाले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चला हवा येऊ द्या’, या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भोसरीतील गाव जत्रा मैदानात झालेल्या या कार्मक्रमात माजी आमदार विलास लांडे बोलत होते. या वेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी महापौर योगेश बहल, मोहिनी लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, संजय वाबळे, विक्रांत लांडे, नाना काटे, रवी लांडगे, योगेश गवळी, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, विराज लांडे, संजय उदावंत, विजय लोखंडे, निवृत्ती शिंदे, नंदू शिंदे, दीपक नकोरे, सुरेखा लोंढे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, शहरातील विकासकामे राष्ट्रवादीने केली आहेत. त्यामध्ये भोसरीतील स्व. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, महापालिका रुग्णालय, लांडेवाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी यासह आळंदीतील थोरल्या पादुका शिल्प आदींसह असंख्य कामाचा समावेश आहे. या कामाच्या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला आहे. भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुल ९० कोटी रुपये निधी खर्च करून, आम्ही सर्व सोयींनी युक्त असा केला. मात्र सध्या त्या उडाणपूलाखाली महापालिका सत्ताधारी सुशोभीकरणाच्या नावाखाली ३८ कोटी रुपयांचे काम करत असल्याचा दिखावा करत आहेत. त्या ठिकाणी विरोधक सोने बसविणार आहेत का ? असा परखड सवाल लांडे यांनी उपस्थित केला. याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे आवाहन लांडे यांनी उपस्थित नागरिकांना केले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे विचारांनी मोठे नेते आहेत. अनेक संघर्षावर मात करत पुणे जिल्ह्याचे नाव देशात घेऊन जाण्याचे काम पवार साहेबांनी केले. हे उभ्या देशाला माहिती आहे. राष्ट्रवादीची सत्ता असतानाच या शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी सात वाजता शहरात उपस्थित राहून कामे करून घेत होते. सर्व अधिकारी सकाळपासूनच कामाला लागत होते. दादांच्या माध्यमातून नाशिक फाटा येथील जे. आरडी टाटा उड्डाणपूल केला. स्पाईन रोडला जाताना प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपूल केला. खा. शरद पवार साहेबांनी दिल्लीतून जेएनएनयूआरएम मधून निधी आणून चांगल्या प्रकारचे उडाणपूल आणि घरकुल केले. अशी बरीच कामे सांगता येतील. विरोधकांनी कोणते मोठे काम केले हे दाखवून द्यावे. भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन खा. शरद पवार यांनी केले आहे. आज त्याची परिस्थिती काय आहे. निधी किती मंजूर होता. वाढीव निधी किती दिला ? किती काम महापालिका सत्ताधार्यांनी केले हे निवडणूक जवळ आली की, जनतेसमोर ठेऊ, असे लांडे म्हणाले.
– खा. कोल्हे संसदेतील हुशार नेतृत्व : माजी आमदार विलास लांडे
बैलगाडा शर्यत बंद करण्यात आली होती. मात्र ती सुरु व्हावी, या साठी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला आज यश आले आहे. राज्यात नंबर एकचा हुशार खासदार अशी ख्याती डॉ. अमोल कोल्हे यांची आहे. ते उत्कृष्ट संसदपट्टू आहेत. अभ्यासाची विचारधारा त्यांच्याकडे आहे. सभागृहात चांगली मांडणी करत अनेक कामे त्यांनी संसदेत लावून धरली असल्याचे लांडे म्हणाले.
– पाच वर्षात शहराची दुर्दशा –
पिंपरी चिंचवड शहराची धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असताना ते चांगले काम करत होते. मात्र तरीही शहरवासियांनी महापालिका निवडणुकीत वेगळा निर्णय घेतला. सध्याच्या महापालिका सत्ताधाऱ्यांमुळे शहराची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत चांगला विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सत्तेत आणूयात, असे आवाहन, माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना केले.