पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३० डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु आहेत. सुमारे सहा हजार उद्योजक महापालिकेला कर देतात. या कररुपी पैशांमधून एमआयडीसी परिसरात मूलभूत सुविधा निर्माण करण्याची सर्व उद्योजकांची अपेक्षा आहे. मात्र ही अपेक्षा पूर्ण करण्यास प्रशासन असमर्थ दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन उद्योग क्षेत्रातील समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी भाजपा नगरसेविका नम्रता लोंढे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील उद्योजक समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे. फूटपाथवर झालेल्या अतिक्रम आणि फूटपाथच्या बिकट अवस्थेमुळे नागरिकांना त्यावरून चालता येत नाही. अंतर्गत रस्त्यांवर नियमितपणे झाडलोट होत नाही, त्यामुळे कचरा वाढत आहे.
एमआयडीसी परिसरात सुरु असलेले अनधिकृत धंदे, वाढत्या चोरीच्या घटना, अनधिकृत भंगार दुकाने, अनेक ठिकाणी होणारी बेकायदेशीर दारूविक्री अशा अनेक समस्या आहेत. महिला कामगारांसाठी सार्वजनिक शौचालय नाही. महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. कंपन्यांचे पाणी मलनिस्सारण करण्यासाठी ड्रेनेज नाही. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांकडे बोट दाखवतात. एमआयडीसी मधील उद्योजकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणीही नगरसेविका लोंढे यांनी केली आहे.