शबनम न्यूज : वृत्तसेवा (दि.०२ जानेवारी ) :- उदगीर येथे होणाऱ्या नियोजित 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येथे झालेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. हे संमेलन मार्च महिन्यात उदगीरला होणार आहे.
उस्मानाबाद येथे झालेल्या संमेलनात फ्रान्सिस दिब्रिटो आणि नाशिक येथे झालेल्या संमेलनात जयंत नारळीकर यांची निवड झाली होती. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सक्रिय अध्यक्षाचा आग्रह धरल्यानंतर सासणे यांच्या नावावर सहमती झाली. मराठवाडा साहित्य परिषद आणि उदयगिरी महाविद्यालय या संमेलनाच्या आयोजक संस्था आहेत. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ यांनीही सासणे यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलन लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रशासकीय अधिकारी ते प्रसिद्ध कथाकार…
भारत सासणे यांचा जन्म २७ मार्च १९५१ रोजी जालना येथे झाला. बीड येथे जिल्हाधिकारी आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी त्यांनी शासकीय सेवा बजावली. ते सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. जॉन आणि अंजिरी पक्षी हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८० मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतरचे विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह),शुभ वर्तमान (कथासंग्रह) ,सटवाईचा लेख (पाच भागात वाटल्या गेलेल्या लेखांचा संग्रह), स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह), क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह) , अदृष्ट (दीर्घकथा संग्रह), अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह) , अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह), आतंक (दोन अंकी नाटक) ,आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह) , ऐसा दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह),कॅंप/बाबींचं दुःख (दीर्घकथा संग्रह),चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका) , चिरदाह (दीर्घकथा संग्रह), जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी), चिरदाह (दीर्घकथा संग्रह), त्वचा (दीर्घकथा संग्रह) , दाट काळा पाऊस (दीर्घकथा), दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका), दोन मित्र (कादंबरी), नैनं दहति पावकः, बंद दरवाजा (कथासंग्रह) ,मरणरंग (तीन अंकी नाटक) , राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी) ,लाल फुलांचे झाड (कथासंग्रह), वाटा आणि मुक्काम (सहलेखक – आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया) या त्यांच्या साहित्य संपदा अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.