शबनम न्यूज : पुणे (दि.०३ जानेवारी) :- ज्येष्ठ नृत्यगुरू माणिकताई अंबिके यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता म्हणून त्यांच्या विद्यार्थिनींतर्फे ‘कलासक्त ‘संस्थेच्या माध्यमातून सादर केलेल्या ‘नृत्यार्पण-२’ कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला . हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता )येथे उत्साहात पार पडला .
या कार्यक्रमात चौसष्ठ योगिनीवरील ‘ध्यायेति योगिनी ‘ ही नृत्य प्रस्तुती तसेच ‘कलासक्त ‘संस्थेच्या विद्यार्थिनींची भाग्यदालक्ष्मी,अमृतवर्षिणी या नृत्य प्रस्तुतीने रसिकांची दाद मिळवली. माणिक ताई अंबिके,त्यांचे पती संजीव अंबीके,ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष,अनुराधा मराठे,मीना प्रभू ,स्वाती दैठणकर, अमृता सुभाष, प्रा. नंदकुमार काकिर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमद्वरा कित्तूर यांनी कलासक्त संस्थेची माहिती दिली.
भारतीय विद्या भवनच्या वतीने माणिकताईना ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.’मी मार्ग दाखविला, त्याचे तुम्ही सोने केले आहे. मी भरून पावले आहे ‘अशा शब्दात माणिकताई अंबिके यांनी सत्काराला उत्तर दिले. संजीव अंबिके,नंदकुमार काकिर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले.मीनाक्षी विडुदला,सुवर्णा बाग यांनी सूत्रसंचालन केले .
या पूर्वी २०१२ मध्ये देखील माणिकताई अंबिके यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ‘नृत्यर्पण ‘ कार्यक्रम सादर करण्यात आला होता. स्मिता सोमण ,प्रमद्वरा कित्तूर ,अर्चना पुरंदरे ,गौरी देशपांडे ,सुवर्णा बाग ,गौरी दैठणकर ,रचना कापसे ,रसिका गुमास्ते ,मेघना साबडे यांनी आयोजनात पुढाकार घेतला होता ,अशी माहिती मेघना साबडे यांनी दिली . माणिकताई अंबिके यांनी एस एन डी टी विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभाग तसेच स्वतःच्या नृत्यांगण संस्थेच्या माध्यमातून नृत्याची आवड निर्माण केली.सामूहिक अरंगेत्रमला प्रोत्साहन दिले,याचा उल्लेख कार्यक्रमात करण्यात आला. विद्युत पागे आणि दिप्ती पेणकर यांनी व्हिडीओ च्या माध्यमातून माणिक ताईंना शुभेच्छा दिल्या आणि नृत्य सादरीकरण केले.