शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ जानेवारी) :- अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या पद्मश्री सिंधूताई सपकाळ या थोर समाजसुधारक होत्या. हजारो अनाथ मुलामुलींचा स्वत:च्या मुलाप्रमाणेच सांभाळ करुन त्यांनी वात्सल्याचा, ममतेचा आदर्श निर्माण केला अशा शब्दात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
सिंधूताई सपकाळ यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांना महानगरपालिकेच्या वतीने महापौर माई ढोरे यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी महापौर माई ढोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्रध्दांजलीच्या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, उप आयुक्त आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, योगेश वंजारे, आरपीआयचे बाळासाहेब भागवत, स्वप्निल कांबळे, वाहतुक आघाडीचे अजीज शेख, भारतीय बौध्द महासभेचे बापूसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, सिंधूताईंचे जीवन अतिशय कष्टप्रद आणि संघर्षमय होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मोठ्या जिद्दीने त्यांनी केलेला जीवनप्रवास शब्दात व्यक्त करता येणार नाही असे सांगून त्यांनी सिंधूताईंचे कार्य यापुढेही चालू ठेवण्यासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी असे सांगितले.