शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ जानेवारी) :- वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना पण हो हे खरं आहे.. तुम्हालाही पिंपरी चिंचवडमध्ये मिळेल मोफत वडापाव आणि चहा मात्र हे मिळण्यासाठी तुम्हाला फक्त त्यासाठी एक काम करावं लागेल.तुम्हाला तहान लागली तर तुम्ही रस्त्याने जाता जाता एखाद्या दुकान किंवा हाॅटेलमधून पाणी बॉटल घेता ना. त्यातील पाणी पिऊन झाले की, रिकामी प्लॅस्टिकची बाटली तुम्ही कच-याच्या डब्यात किंवा फेकून देता मात्र ;असे न करता तुम्ही रिकाम्या पाच ते दहा बाॅटल एकञ जमवून त्या वडापाव आणि चहा विक्रेत्यांना द्या मग तो तुम्हाला चहा किंवा वडापाव मोफत खायला देईल आहे का नाही भन्नाट उपक्रम ! हा अनोखा प्रोत्साहनपर उपक्रम स्वच्छ व प्लॅस्टिक मुक्त शहरासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आणला आहे. त्याला प्रतिसाद देऊन स्वच्छतेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांसह विक्रेत्यांनाही प्रशासनाने केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय म्हणाले की, नागरिकांनी पाणी व शीतपेयाच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करून त्या बदल्यात त्यांना मोफत चहा व नाश्ता स्वरुपात मोबदला देण्यासाठी शहरातील इच्छुक छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हाथगाडीवाले किरकोळ विक्रेत्यांनी महापालिकेत समवेत काम करावे. यासाठी पालिकेने आवाहन केले आहे तसेच संकलित केलेल्या प्लॅस्टिक बाटल्या महापालिकेकडे द्याव्यात.
त्यांचे वजन करून चहा, नाश्ता अथवा जेवण यापोटी केलेल्या खर्चाची रक्कम दिली जाईल. इच्छुक व्यावसायिकांनी महापालिका मुख्यालयात आरोग्य विभाग, मुख्य कार्यालय, दुसरा मजला येथे संपर्क साधून अर्ज भरून द्यायचा आहे. प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी छोटे हॉटेल व्यावसायिक व किरकोळ विक्रेते यांच्याकडून आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. विक्रेता व व्यावसायिकाने अधिकृत अन्न परवाना असणे आणि त्यांच्या हॉटेल व व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. असे असेल तरच त्यांना परवानगी दिली जाईल.