शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० जानेवारी) :- पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या संचालक मंडळाची बैठक स्वारगेट येथील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, यांचे कार्यालयात पार पडली. यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सहा कोटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून चार कोटी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याकामी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती यांनी सहमती दिली असून त्याप्रमाणे कार्यवाही करावी अशा सूचना बैठकीत देण्यात आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजने अंतर्गत परिवहन महामंडळाकडील सेवकांची प्रतिपुर्तीची व हॉस्पिटल देयके तपासणी कामी आरोग्य विभागाकडील वैद्यकिय अधिकारी यांना देण्यात येत असलेली मुशाहिराची रक्कम रुपये १०००/- ऐवजी २०००/- प्रमाणे अदा करणेस संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळामधील पी.सी.एम.टी. कर्मचा-यांची वैद्यकिय बिले व पी.एम.टी. कर्मचा-यांची वैद्यकिय बिले स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
पी.एम.पी.एम.एल. मधील ज्या कर्मचा-यांना कामावरुन कमी केले होते अशा कर्मचा-यांनी पुन्हा सेवेमध्ये रुजू करुन घेणेकामी अपिल केले होते अशा कर्मचा-यांचे अपिल अर्ज मंजूर करुन त्यांना पुन्हा नियमित सेवेत घेण्याच्या विषयास यावेळी मान्यता देण्यात आल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.