शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ जानेवारी) :- जय जवान जय किसान चे प्रणेते माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक आणि मुत्सुद्दी राजकारणी होते असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारती मधील माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, लाल बहादूर शास्री यांचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यांनी सामाजिक कार्यासाठी आपले जीवन समर्पित केले. नम्रता, दृढ विश्वास आणि निर्णय क्षमतेमुळे ते जनमाणसात लोकप्रिय होते असे सांगून त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.