शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ जानेवारी) :- देहू आळंदी रस्त्यावरील भारतमाता चौकात भव्य असे श्री नागेश्वर महाराज यांचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू आळंदी मध्ये वसलेले मोशी गाव, गावाला सांस्कृतिक वारसा असल्याने गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांचे भाविक संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत.
पिंपरी चिंचवड शहराची हद्द मोशीतील इंद्रायणी नदी पर्यंत आहे देहू आळंदी कडे जाणारा वारकरी संप्रदाय व तसेच पुणे-नाशिक महामार्गावर ये-जा करणार्या नागरिकांना एक भव्य प्रवेशद्वार दिसावे, महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार होणारे श्री नागेश्वर महाराज यांचे प्रवेशद्वार देहू आळंदी रस्त्यावरील भारत माता चौकात उभे करावे, अशी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे. म्हणून भव्य असे श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेशद्वार मोशीतील भारत माता चौकात उभारण्यात यावे, असेही सदर निवेदनात वसंत बोराटे यांनी नमूद केले आहे.