शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ जानेवारी) :- असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे दि. १७ जानेवारी २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना पत्रा शेड लींक रोड प्रकल्पातील सदनिकांच्या लवकरात लवकर चाव्या द्याव्यात, अन्यथा आम्ही कुलूप वाटप करू या आशयाचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १९ भाटनगर पत्राशेड पुनर्वसन प्रकल्प मधील तब्बल बारा वर्षानंतर ११२ सदनिका तयार झालेल्या आहेत. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी ११२ सदनिकाधारकांनी प्रत्येकी ५० हजार स्वहिस्सा भरून देखील पाच महिन्यांपूर्वी लकी ड्रॉ झालेला असताना तसेच ताबा पावती दिलेली असताना देखील आपल्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागामार्फत सदनिकाधारकांना सदनिका वाटप करण्याऐवजी टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येतात. तेव्हा आपण आपल्या विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता आपण त्वरित पूर्ण काम झालेल्या ११२ सदनिकांच्या चाव्या सदनिकाधारकांना लवकरात लवकर देण्यात याव्या.
अन्यथा आम्ही असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे दोन दिवसांमध्ये सर्व ११२ सदनिकाधारकांना नवीन कुलूप वाटप करून ताबा देऊ, असेही सदर निवेदनात सुंदर कांबळे यांनी नमूद केले आहे.
यावेळी आयुष्मान सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर, अशोक गायकवाड चेअरमन फुले शाहू आंबेडकर सोसायटी, प्रदीप कांबळे, देविदास साळवे उपस्थित होते.