शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ जानेवारी) :- जागतिकीकरणाच्या व स्पर्धेच्या युगामध्ये आपले व्यक्तिमत्त्व व आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टिकोनातून इंग्रजी भाषा ही काळाची गरज ठरत आहे.त्यामुळे इंग्रजी विषयाचे महत्व विचारात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी व इंग्रजी संभाषण कौशल्य वाढावे या हेतूने श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विभागा अंतर्गत एफ. वाय. बी. ए., एफ. वाय. बी. कॉम. व एफ. वाय. बी.बी.ए (सी. ए.) च्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ची सुरुवात करण्यात आली आहे.
सदर कोर्स ची रचना चार टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात Grammar, दुसऱ्या टप्प्यात Vocabulary, तिसऱ्या टप्प्यात Writing Skills व चौथ्या टप्प्यात Conversation Skills विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे.या कोर्सचे उद्घाटन महाविद्यालयामध्ये ऑनलाइन व्याख्यानाद्वारे करण्यात आले. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. छाया जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तसेच कोर्सची रूपरेषा मांडली.उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांना सदर कोर्स चे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक अभ्यास,सातत्य व कौशल्ये या विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये सदर कोर्स च्या अभ्यासबद्दल गांभीर्य व एकनिष्ठता निर्माण व्हावी यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञाबद्ध केले.
या कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी विभाग अंतर्गत करण्यात आले होते. कोर्स सुरू करण्यासाठी महाविद्यालयाचे खजिनदार, मा.श्री.मयूर ढमाले सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले..कार्यक्रमा दरम्यान सदर कोर्स शिकवणारे विषय शिक्षक प्रा.सीमा साळुंखे, प्रा.विश्वनाथ व्यवहारे, प्रा.प्रविण डोळस व डॉ.छाया जोशी यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचा व कोर्समध्ये विविध स्तरांवर शिकविल्या जाणाऱ्या घटकांचा परिचय करून दिला. प्रा. प्रविण डोळस यांनी उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शरदचंद्र पवार महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील प्रथम वर्षातील सर्व शाखांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उपस्थिती दर्शवली होती. अशी माहिती महाविद्यालयाचे, प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.