शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० जानेवारी) :- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी लि. च्या वतीने ‘ओपन डेटा सप्ताह’ दि.१७ ते २१ जानेवारी २०२२ या कालावधीत सुरु असून या कार्यक्रमाचा समारोप शुक्रवार दि. २१ जानेवारी २०२२ रोजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी १०.०० वाजता ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे करण्यात येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी लि.चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली. या कार्यक्रमास स्मार्ट सिटी लि.च्या संचालक मंडळातील सदस्य तथा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक प्रमोद कुटे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या ओपन डेटा सप्ताह समारोप कार्यक्रमात या सप्ताहाबाबत व ओपन डेटा या संदर्भात तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून एसीपी श्रीकांत डिस्ले, अश्वीन श्रीवास्तव, अनिरुध्द पंत, डॉ. प्रशांत पानसरे, डॉ. अपुर्वा पालकर, गीता तोलीया, निरज शाह, विनीत देव, सुनील चांदुरकर, प्रो. धीरज अग्रवाल, प्रो. हेमंत राजेश यांच्यासह जेएसपीएम राजर्षी शाहु महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, एमयुसी कॉलेज ऑॅफ कॉमर्स, पिंपरी या महाविद्यालयांचे प्रतिनिधी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पाण्याचे व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षितता, आरोग्य, डिजीटल कनेक्टीव्हीटीया विषयावर हॅकेथॉन आणि स्टार्टअप पीचफेस्ट हे कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात होणार असून या कार्यक्रमादरम्यान सादर केल्या जाणाऱ्या प्रात्याक्षिकांचा पारितोषिक वितरण सोहळा महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व महापालिका आयुक्त श्री. राजेश पाटील यांच्याहस्ते होणार असल्याचे स्मार्ट सिटी लि.चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी नमूद केले.
केंद्र शासनाने 100 शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड केली असून यामध्ये नागरिकांच्या सूचना घेण्यासाठी ओपन डेटा सप्ताह हा कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमातंर्गत शासनाच्या ओपन डेटा धोरणाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत. या ओपन डेटा उपक्रमाचा मुख्य उद्देश स्मार्ट सिटी ओपन डेटा पोर्टलला समृद्ध करणे असा असून ज्या शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली आहे, त्यांच्यामार्फत दर्जेदार डेटासेट, डेटास्टोरी, ब्लॉग आणि एपीआय अपलोड केले आहेत. यानुसार स्मार्ट सिटी लि.च्या मदतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अन्य विभागांनी स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर डेटासेट अपलोड केले आहेत, ज्याचा सर्वभागधारक जसे की शासकीय- निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक किंवा संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, किंवा महाविद्यालये, शहरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार याचा वापर करण्यास मदत होणार आहे. हा ओपन डेटा कोणीही ऍक्सेस करु शकतो, वापरु शकतो आणि शेअर देखील करु शकतो. नागरिकांपासून उद्योजकांपर्यत संशोधक आणि व्यवसायांपर्यंत, कोणीही कोणत्याही कारणास्तव याचा वापर करु शकतो. या माध्यमातून नागरिक प्रशासन किंवा महानगरपालिकेला आपले अभिप्राय देखील देवू शकतात. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी याचा वापर होणार आहे.