पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय
शबनम न्यूज : पुणे (दि.२२ जानेवारी) :- कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या करोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख , विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे , आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे पुणेकरांच्या आरोग्याचा विचार करूनच आम्ही निर्णय घेत असतो. अजूनतरी आठ दिवस तरी कोरोनाची आकडेवारी खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट 27 टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
राज्यात सोमवार पासून सर्व शाळा सुरु होणार आहेत. मात्र शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दर्शवला होता. यानंतर आज पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.
पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार !
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Advertisement— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022