शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ जानेवारी) :- भारताच्या लोकशाही परंपरेचे जतन करून प्रत्येकाने निर्भयपणे आणि नि:पक्षपातीपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीस अधिक बळकट करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी महापौर माई ढोरे बोलत होत्या.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वामन नेमाणे तसेच दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी आदी प्रत्य़क्ष तर मोठ्या संख्येने मतदार हे ऑनलाईन उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या देशातील लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका यासारख्या संस्था लोक सहभागातून, मतदानाच्या माध्यमातून बळकट होत असतात. आपल्याला मिळालेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. या करिता आपण सर्वांनी स्वत: तर मतदान करावेच आणि आपल्या आजूबाजूला देखील याबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले.
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करु. मुक्त, नि:पक्षपातीपणे व शांततापुर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू तसेच धर्म, वंश, जात, समाज आणि भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करु अशी शपथ घेतली. शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले आणि उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाबाबत आणि मतदानाच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले तसेच दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सर्व स्तरावरील व्यक्तींचा मतदानात सहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांनी मानले.