शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ जानेवारी) :- दापोडी ते निगडी दरम्यान अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व मोटार विरहित वाहतुकीच्या (NMT) अनुषंगाने सर्वसमावेश पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे व सुशोभिकरण करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व सूचना महानगरपालिकेला द्याव्यात, असे आवाहन मा.महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि मा.आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
शहरी वाहतुकीच्या दृष्टीने परिवर्तनाच्या मार्गावर आहेत. शहरीकरण व नागरिकरण यामुळे विविध सार्वजनिक वाहतूक पर्याय निवडणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने सकारात्मक नियोजन करुन नजिकच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक व मोटार विरहित वाहतुक (NMT) व सर्वसमावेश पायाभूत सुविधा उभारण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार शहरातील दापोडी ते निगडी या मुख्य रस्त्याचे सलग पादचारी मार्ग व सलग सायकल मार्ग या संकल्पने आधारे रस्त्याचे विकसन करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. दापोडी ते निगडी या मुंबई पुणे रस्त्याच्या सेवा रस्त्यांचे नुतनीकरण करण्याचे महानगरपालिकेने नियोजन केले असून त्यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करुन सेवा रस्त्याचे डिझाईन अंतिम करावयाचा मनपाचा मानस आहे. त्याकरीता सद्यस्थितीतील सेवा रस्ता व त्याचे नव्याने पादचारी व सायकल चालविण्यास सुरक्षित असा नियोजित रस्ता यांचे सादरीकरण मनपाच्या Website व स्मार्ट सिटी Website, App येथे पाहण्यास उपलब्ध आहे. तरी, नागरिकांनी याबाबत त्यांचे अभिप्राय मनपाच्या संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in सारथी अँप, स्मार्टसिटी संकेतस्थळ व brts@pcmcindia.gov.in यावर द्यावेत.