प्रकाश जावडेकर यांच्या वाढदिवशी वारजे नागरी वन उद्यानात वृक्षारोपण
शबनम न्यूज : पुणे (दि.३१ जानेवारी) :- माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ७१ रोपे लावून वृक्षारोपण कार्यक्रम आज “स्मृतिवन”-नागरी वन उद्यान गणपती माथा, वारजे टेकडी येथे उत्साहात झाला.
तेर पॉलिसी सेंटर च्या वतीने रविवार, ३० जानेवारी २०२२ सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमात तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर,आमदार भीमराव तापकिर, डॉ. संजय बुटाला, शिवराम मेंगडे, आदित्य माळवे आदी पदाधिकारी, वन खात्याचे अधिकारी,नागरिक उपस्थित होते.
‘संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याविषयी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, कार्बन उत्सर्जन तातडीने कमी करण्याची गरज असून त्यासाठी वृक्षलागवड हा महत्त्वाचा उपाय आहे त्याचप्रमाणे आगामी काळात नागरी वने हा ध्यास व्हावा, ‘ असे प्रतिपादन माजी केंद्रीय वने व पर्यावरण, हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या कार्यक्रमात केले.
ते म्हणाले, ‘ देशभरात नागरी वने ही चळवळ झाली पाहिजे. वारजे नागरी वनाचा पुढील टप्पा लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे. प्रत्येकाने वाढदिवसाला वाढीचे प्रतिक म्हणून झाडे लावली पाहिजेत.
*वारजे टेकडी नागरी वन हा यशस्वी प्रकल्प* : डॉ. विनिता आपटे
वारजे शहरी वनक्षेत्र हा अतिक्रमणाच्या सावटाखाली असणारा असाच एक भाग होता. २०१५ साली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निर्देशांनुसार वारजेला पर्यावरण आणि परिसंस्थेच्या दृष्टीने एक ‘हरितस्थळ’ म्हणून रूपांतरित करण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी – खासगी (PPP) भागीदारीतून हे ‘स्मृतीवन’ अस्तित्वात आले असून २०१५ ते २०२२ या काळात वारजे येथे सुमारे साडेसात हजार झाडे लावली गेली जी आता २० ते २५ फूट उंच वाढली आहेत. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतिनिमित्त झाडे लावली आणि ती दत्तक घेतली, असे डॉ. विनिता आपटे यांनी सांगीतले.