शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०२ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेवक माजी उपमहापौर केशव घोळवे यांना फसवणुकी प्रकरणात पिंपरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. महापालिकेकडून गाळे मिळवून देतो असे सांगून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात मोहम्मद तय्यब अली शेख (वय ४५ रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव व माजी उपमहापौर, नगरसेवक केशव घोळवे तसेच हसरत अली शेख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि इतर व्यापारी नेपाळी मार्केट येथे कपड्यांचा व्यापार करतात त्यांची जागा मेट्रोच्या प्रकल्पात जाणार आहे. त्याला पर्याय म्हणून शासनाकडून फिर्यादी आणि व्यापाऱ्यांना शंभर गाळे कायदेशीर मिळणार आहेत, असे असताना आरोपींनी आपसात संगणमत करून सन 2019 ते आज पर्यंत फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांना महापालिकेकडून गाळे मिळवून देतो असे आश्वासन दिले, त्याकरिता भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडले. यातून फिर्यादी आणि इतर व्यापाऱ्यांची फसवणूक केली.
तसेच शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून 55 हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर एक लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्यादीत म्हटले आहे
याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.