शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- माजी खासदार गजानन बाबर यांच्या निधनाने सर्वसामान्य माणसांचे नेतृत्व करणारा मुत्सद्दी राजकारणी हरपला अशा शब्दांत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी माजी खासदार गजानन बाबर यांना श्रध्दांजली वाहिली.
माजी खासदार गजानन बाबर यांचे दि. २ फेब्रुवारी रोजी निधन झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नगरसदस्या शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, दिवंगत गजानन बाबर यांनी खासदार, आमदार, विरोधी पक्षनेते आदी पदांवर कामकाज करीत असताना सर्व स्तरावरील नागरिकांसाठी कामकाज केले असून त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.
दिवंगत गजानन बाबर हे १९९२-९३ या वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते होते.