शबनम न्यूज | पुणे
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत शारदोत्सव कार्यक्रमात प्रा.नेहा सावंत भवन्स महाविद्यालय अंधेरी या बोलत होत्या. ‘डबिंग ,शब्दांकन – एक कला’ याविषयावर त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.अपर्णा पांडे यांनी केले . आपल्या प्रस्तावनेत भाषेच्या माध्यमातून अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत .त्यापैकी डबिंग व शब्दांकन ही क्षेत्र आहेत . आपण भाषेचे ज्ञान विस्तारले की अनेक संधी चालून येतात असे त्या म्हणाल्या .या वर्षी अंतर्गत परीक्षा चालू असल्याने फेब्रुवारीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे असा खुलासा त्यांनी केला.
प्रा. नेहा सावंत यांना आपल्या व्याख्यानात डबिंग करताना ज्या व्यक्तीला आवाज द्यायचा आहे. त्याच्या आवाजाची पोत, तो कसा आहे . उदा. कोमल , भसाडा ,खर्जातला, घशातून येणारा इ. हे सर्व बारकावे पहावे लागतात. त्या व्यक्तीच्या लकबी समजून घेऊन त्याच्या भूमिकेत शिरून आवाज द्यावा लागतो. चित्रपट , मालिका , जाहिरात , माहितीपट यांचे डबिंग वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते . हे त्यांनी सोदाहरण दाखविले . रामानंद सागर यांच्या ‘ रामायण ‘ या मालिकेत त्यांनी १२ व्यक्तिरेखांना आवाज दिला. या विषयी सविस्तर सांगितले .
मास्तरांची सावली ( कृष्णाबाई सुर्वे ) , सांगायची गोष्ट म्हणजे ( हिरा दया पवार ) , नोहे एकल्पाचा खेळ ( डॅा.प्रकाश खांडगे ) यांच्या आत्मकथनांचे शब्दांकन केले आहे. तीनही व्यक्तींचे स्वभाव वेगळे होते. भाषा वेगवेगळी होती यासाऱ्या गोष्टींला लेखन करताना विचार करावा लागतो. मास्तरांची सावली या शब्दाकनांची कहाणी त्यांनी
उलगडली.कृष्णाबाईची ढब , कोकणी पद्धतीचे स्री असूनही पुल्लींगी पद्धतीने बोलणे यासाऱ्या गोष्टी पुस्तकात आणताना खूप प्रयत्न करावे लागले. आयुष्यातल्या महत्त्वांच्या क्षणांची निवड करणे, त्यांची कालानुक्रमे संगती लावणे यासाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. शब्दांकन करणाऱ्या व्यक्तीची भूमिका सरोगेट मदर सारखी असते. बाळंतपणाच्या कळा सोसायच्या पण त्या मुलावर आपला हक्क नसतो. ते मूल आपले नसते. ज्यावेळी पुस्तकाचे शब्दांकन करतो ,त्यावेळी त्या व्यक्तीत शिरुन लेखन करावे लागते . लेखन संपले की त्या पुस्तकाची नाळ तुटते. एक रितेपण येते. कृष्णाबाईंच्या भूमिकेतून बाहेर पडल्यावर आलेल्या रितेपणा विषयी त्यांनी सांगितले.
मुंबईला डबिंगला जातात अनेक महाविद्यालयातील विद्यार्थीही तेथे असतात याचा दाखला देऊन तुम्ही विद्यार्थी अशा विविध करिअरच्या संधींचा लाभ घ्यायला हवा असे त्या म्हणाल्या .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. अभय खंडागळे होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॅा. बेंजामिन लोबो यांनी मराठी विभागाला कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या . फर्ग्युसन महाविद्यालयातील आपल्या दिवसांविषयी सांगत आपण मराठी विभागाच्या कार्यक्रमात सहभागी होत होतो हे त्यांनी सांगितले . केशवसुतांची ‘सतारीचे बोल’ ही कविता आपल्याला आवडत होती असेही सांगितले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॅा. धनंजय वाघमारे यांनी तर डॉ संगीता लांडगे आभार प्रदर्शन केले . तांत्रिक सहाय्य . डॅा. रामदास लाड व प्रा . आकाश बागडे यांनी केले . या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक ,अंधेरी भवन्स महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे संयोजन मा. प्राचार्य अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा. अपर्णा पांडे यांनी केले त्यांना डॅा. वाघमारे , डॅा. लांडगे व सकाळ यिन चे जिल्ह्याध्यक्ष चेतन लिम्हण यांनी सहाय्य केले.