शबनम न्यूज : पुणे (दि.०८ फेब्रुवारी) :- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुढील महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार 15 मार्चपासून दहावीची परीक्षा तर 4 मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. दरम्यान दहावी आधी पार पडणाऱ्या बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट उद्या (बुधवारी) दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.
www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर बारावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकीट प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी संबधित ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनाने दिली आहे.
हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती बाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत'( डुप्लिकेट) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.