विनोद आणि आनंदाचं नातं वृध्दींगत व्हावे : शिवराज गोर्ले
शबनम न्यूज : पुणे (दि.१३ फेब्रुवारी) :- अभिनेते विजय पटवर्धन यांच्या ‘विजय पटवर्धन फाऊंडेशन ‘ तर्फे आयोजित ‘निर्मला-श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ विनोदी लेखक, नाटककार शिवराज गोर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम निळू फुले कला अकादमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रस्ता, पुणे येथे झाला.
साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, स्पर्धेचे परीक्षक डॉ. समीर मोने आणि राजेश दामले, डॉ. समीर डोलारे, दीपक रेगे , सुरेंद्र गोखले, दिलीप हल्याळ , धनंजय आमोणकर, अभिजीत इनामदार , सुधीर फडतरे, राजू बावडेकर, प्रशांत तपस्वी, मधुरा टापरे उपस्थित होते.
मेघा पाटील यांना या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ,द्वीतिय क्रमांकाचे पारितोषिक प्रसाद गोडबोले यांना मिळाले.तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून अपर्णा देशपांडे, डॉ.श्रीकांत नाडगौडा यांना देण्यात आले.
विजय पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. फाऊंडेशनच्या सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. वृषाली पटवर्धन यांनी स्वागत केले.आशुतोष नेर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले.
विनोद आणि आनंदाचं नातं वृध्दींगत व्हावे : शिवराज गोर्ले
‘लेखनासाठी वयाची अट नसते. आपण स्वतःला व्यक्त करण्यासाठी लिहितो. स्पर्धेच्या निमित्ताने आपण लिहिताना जो आनंद मिळवतो, तेच बक्षिस असते. विनोदी लेखन हे आनंद इतरांना वाटण्याचे काम आहे. विनोद आणि आनंदाचं नातं आहे , ते वृध्दींगत केले पाहिजे, असे सांगून शिवराज गोर्ले म्हणाले, ‘ अशा विनोदी लेखन स्पर्धाच्या निमित्ताने आनंदाचे व्यासपीठ निर्माण झाले, हे महत्वाचे आहे. लोकांना विनोदी लेखनाकडे वळविण्याचे काम या स्पर्धामधून घडले आहे.
विनोदी लेखनाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘दिलखुलास मनाची माणसंच विनोदी लेखन करू शकतात. दुसऱ्यांच्या कलेला दाद द्यायला शिकलं पाहिजे. विनोद सहजगत्या यायला हवा. विनोद घडवणं अवघड असते. विनोदाची पातळी सांभाळणं हे महत्वाचं असते.
शिवराज गोर्ले पुढे म्हणाले, ‘माणसातील विनोद टिपायचा शिकण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत. निरीक्षण करायची दृष्टी पाहिजे. बारकावे टिपता आले पाहिजेत.विनोदी प्रसंग सांगण्याची शैली असली पाहिजे ‘.
कोरोना साथीच्या काळात विजय पटवर्धन फाऊंडेशनने कलाकारांना , बॅक स्टेज आर्टिस्टना मदतीचा हात देण्याचे सर्व उपक्रम कौतुकास्पद होते, असेही शिवराज गोर्ले यांनी सांगीतले.
विनोदी लेखन स्पर्धेविषयी :
श्रीनिवास पटवर्धन, हे विजय पटवर्धन यांचे वडिल एक विनोदी लेखक होते आणि त्यांची अनेक पुस्तके आणि लेख प्रसिद्ध आहेत. निर्मला पटवर्धन या विजय पटवर्धन यांच्या आई , त्या श्रीनिवास पटवर्धन यांना लेखनकार्यात मदत करायच्या. त्या दोघांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही विनोदी लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.