शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली, मोरे वस्ती परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी शिवसेनेचे नेताजी काशीद यांनी पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चिखली मोरे वस्ती सह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात करदात्या नागरिकांना सध्या मोकाट कुत्र्यांची दहशत सहन करावी लागत आहे. शहरातील प्रत्येक रस्ता, गल्ली, चौक, परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या कुत्र्यांच्या टोळक्यांनी चांगली दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. महापालिका या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. पण ही मोकाट कुत्री दिवसेंदिवस वाढतच आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून चालणेही मुश्कील झाले आहे. दुचाकी घेऊनही निघाले तर मोकाट कुत्री पाठलाग करतात. यामुळे दुचाकीस्वारांचे अपघातही घडले आहेत. कुत्रांच्या झुंडी अंगावर धावून येतात. मोरेवस्ती व म्हेत्रे वस्ती परिसरात प्रत्येक सोसायटीतील नागरिक या मोकाट कुत्र्यांमुळे त्रस्त आहेत. शिवाय ही मोकाट कुत्री सोसायटी परिसरात घाण करतात. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोकाट कुत्री पकडण्यासाठी श्वानवाहन, प्रशिक्षित मनुष्यबळ, नसबंदी खर्च व त्यानंतर देखभाल आदींवर महापालिका मोठ्या प्रमाणात खर्च करते. मात्र आजही शहरातील कुत्र्यांची संख्या पाहून यातून महापालिकेने मोकाट कुत्र्यांवर केलेला खर्च पाण्यात गेला असेच म्हणावे लागेल नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही सदर निवेदनात नेताजी काशीद यांनी नमूद केले आहे.