शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ फेब्रुवारी) :- देशाचे अभिमान आणि मराठी अस्मितेचे स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज अखंड उर्जेचे प्रेरणास्त्रोत आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराजांचे विचार देशाला आजही तेवढेच प्रोत्साहीत करतात, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन दि.१७ फेब्रुवारी ते दि. १९ फेब्रुवारी या दरम्यान पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्या सुलक्षणा धर, माजी नगरसेवक मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे सागर तापकीर अभिषेक मस्के, दत्तात्रय शिंदे, दादा पाटील, सतीश काळे, गणेश सरकटे, प्रकाश जाधव, बापूसाहेब गायकवाड, नकुल भोईर अॅड. रानवडे, धनंजय येळवंडे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले सूत्रसंचालन प्रफुल पुराणिक यांनी केले तर आभार माजी महापौर योगेश बहल यांनी मानले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन देखील महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
शुक्रवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता “छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील बहुजनांची भूमिका आणि सद्यस्थिती” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये माजी खासदार हरीभाऊ राठोड, सामाजिक नेते राजेंद्र कोंढरे, प्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ. सुरेश शेळके आणि भारतीय संविधान अभ्यासक शशिकांत औरंगाबादकर सहभागी होणार आहेत. यानंतर सायंकाळी ७ वाजता ख्यातनाम शाहिर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलश्याचा कार्यक्रम होईल.
हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने होत असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण www.facebook.com/pcmcindia.gov.in या फेसबुक पेजवरून आणि pcmcindia या यू ट्यूब चॅनेलवरुन होत आहे. या लिंकद्वारे नागरिकांनी सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.