शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ फेब्रुवारी) :- भारतीय सैन्य दलातील शूर आणि धाडसी व्यक्तिमत्व तसेच ‘आयर्न मॅन’ हा जगद्विख्यात पुरस्कार प्राप्त करणारे सैन्यदलातील प्रथम विजेते मेजर जनरल विक्रम डोगरा सर यांनी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल ला भेट देत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला .
केंब्रिज स्कूलचे मानद सल्लागार असणाऱ्या मे. जन. डोगरा सर यांना शाळेच्या आर्मी पथकाने मानवंदना दिली व पारंपारिक भारतीय पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. डोगरा सरांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. धनंजय वर्णेकर, सचिव श्री ज्ञानेश्वर काळभोर, संचालक श्री राम रैना , संचालिका सौ शितल ताई वर्णेकर, विश्वस्त सौ राजश्रीताई काळभोर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन विक्रम डोगरा सरांचा सत्कार करण्यात आला . शाळेच्या उपप्राचार्या सरबजीत कौर यांनी प्रास्ताविका द्वारे शाळेच्या अभ्यासक्रम व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत संस्थेचा भारत भर होणारा शाखा विस्तार व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवला.
विक्रम डोगरा सरांच्या जीवन कार्याचा परिचय केंब्रिज गुरुकुलच्या कार्यकारी व्यवस्थापिका रत्ना माने मॅडम यांनी उपस्थितांना करून दिला .
संचालक श्री राम रैना यांनी निवडक विद्यार्थ्यांसोबत मेजर जनरल डोगरा सरांशी प्रश्नोत्तरा द्वारे विविध बाबींवर संवादात्मक प्रकाश टाकला . आयर्न मॅन किताब मिळवण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली ?याचे अभिमानाने संवादात्मक उत्तर देताना मेजर जनरल डोगरा म्हणाले, “माझ्या आई-वडिलांपासून ते करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या असंख्य व्यक्तींच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभावाने प्रेरित होऊन, विजेता होण्याचे स्वप्न साकार झाले. “
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल ची शैक्षणिक उद्दिष्टे, कार्यप्रणाली, उपक्रम व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासपूर्वक सहभाग पाहून डोंगरा सर भारावून गेले व सर्व व्यवस्थापन व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
‘ नेशन फर्स्ट’ या ब्रीदवाक्याचा संस्कार केंब्रिज च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच शिकायला मिळत असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करत विक्रम डोगरा सरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभकामना दिल्या.