शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.०१ मार्च ) :- “भारतीय कला आणि ज्ञानसंपदा परंपरेने आपल्याकडे आली आहे, त्याचे संवर्धन करून तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत तो पोहचवा!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या दोन दिवसीय वर्धापनसोहळ्याचे उद्घाटन करताना पिंपरी-चिंचवड लिंक रोड, चिंचवड येथे रविवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी केले. नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, चेतन गावडे, उज्ज्वला गावडे, गणेश गावडे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, उपाध्यक्ष अशोक नागणे, सचिव आर. आर. कुलकर्णी, खजिनदार रवींद्र झेंडे, संघाचे मार्गदर्शक अशोक कपोले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘आनंद २०२२’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात एकपात्री कलाकार मधुसूदन घाणेकर आणि प्रशांत राजे यांनी आपली कला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. सोमवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. सुशीलकुमार लवटे यांनी आपल्या व्याख्यानातून ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांची विशेष उपस्थिती होती. त्यानंतरच्या सत्रात आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी नृत्य, गायन, अभिनय इत्यादी कलागुणांचे बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या संयोजनात स्वाती काकडे, आशा कुलकर्णी, शालिनी कुलकर्णी, प्रा.डॉ. किरण गंगापूरकर, संजय देशपांडे, कविता कोल्हापुरे, प्रदीप वळसंगकर, विजय राजपाठक यांनी परिश्रम घेतले. उमा पाडुळकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनंदा माटे यांनी आभार मानले. वंदना बोरकर यांच्या पसायदानाने दोन दिवसीय सोहळ्याची सांगता करण्यात आली.