शबनम न्यूज : पुणे ( दि.०२ मार्च ) :- सन १९७१ ते १९७२ या कालावधीतील मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर,पुणे येथे शिकलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी मेळावा पंचसूत्री कार्यक्रमाने दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ ते २७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपन्न झाला.
शालेय शिक्षण पूर्ण करुन पुढील आयुष्याची यशस्वी वाटचाल करण्यास ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मॉडर्न हायस्कूलमधील ह्या माजी विद्यार्थ्यांच्या संघाने हे सुवर्ण महोत्सवी वर्ष वेगळेपणाने साजरे करण्याचे ठरविले. सर्वप्रथम गुरुंना वंदन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यासाठी आपल्या शिक्षकांचा मानपत्र देवून यथोचित सत्कार केला. यापैकी श्री.महाजन सर हे ९८ वर्षांचे, तर नेने बाई या ८५ वर्षांच्या. त्यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे समारंभास हजर राहणे शक्य नसल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानपूर्वक मानपत्रे देण्यात आली आणि श्री.पी.के.जोशी सरहे ९३ वर्षांचे असून सुद्धा उत्तम स्वास्थ राखल्यामुळे प्रत्यक्ष समारंभास दोन तास उपस्थित राहिले. सन्मानाच्या उत्तरा दाखल भाषण करताना तीव्र स्मरणशक्ती, अस्खलित वक्तृत्व आणि समयोचित संदेश देताना त्यांच्या शाळेतीलप्रदीर्घ कालावधीच्या आठवणी दाटून आल्या. त्यांच्या भाषणात त्यांनी एका मोठ्या संस्कृत श्लोकाने सुरुवात करून शाळेबद्दलच्या मराठी कवितेने वाङ्मयीन समारोप केला. ह्या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांपैकी नुकतेच निधन पावलेले कै.प्रभाकर अनंत भडकमकर यांनी सर्व शिक्षकांबद्दल लिहिलेल्या आठवणींचे ङ्गआमचे गुरूङ्घ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी कै.भडकमकर ह्यांची कन्या नुपुरा भडकमकर हिने माजी मित्रपरिवाराचे सद्गदीत अंतःकरणाने आभार मानले.
ज्या शाळेने आपल्याला घडविले त्या शाळेच्या ऋणानुबंधाची वीण घट्ट करण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांनी सुचविलेल्या खालील एकूण सुमारे ३ लाख किंमतीची मदत केली.
१. कलात्मकदृष्ट्या बनविलेल्या पुस्तकांची ७ झाडांच्या आकाराची कपाटे – एकूण किंमत अंदाजे रुपये
८४,०००.००
२. ३५ बाके एकूण किंमत अंदाजे १ लाख ५ हजार.
३. गरीब विद्यार्थ्यांची थकीत फी – अंदाजे रूपये १ लाख २५ हजार.
ह्या व्यतिरिक्त इयत्ता पहिली ते सातवी मधील सुमारे ८०० विद्यार्थी व पालक ह्यांना रॅम्बो सर्कसचा
विशेष खेळ आयोजित करून मनमुराद आनंद दिला.
सुवर्ण महोत्सवी मेळाव्यानिमित्त आता वयाने ६० ओलांडली असली तरी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या जुन्या वर्गातील बाकावर बसून आठवणींना उजाळा दिला.तसेच गणवेशासारखे विशेष टी शर्ट परिधान करून
कमीत कमी साधनातून क्रिकेट, डॉजबॉल व पतंग या सारख्या आनंद घेतला.
कै.वामन गाडगीळ हा वर्गमित्र एक उत्कृष्ट कॅरमपटु होता. चार वर्षांपूर्वी त्याचे अपघाती निधन झाले होते.
त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ५५ वर्षे वयांवरील नागरिकांसाठी खुली कॅरम स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यात सुमारे ६४
खेळाडूंनी भाग घेऊन भरघोस प्रतिसाद दिला. सर्वात वयस्कर प्रतिस्पर्धी डॉ.ववळेकर हे ८१ वर्षाचे होते. स्पर्धेचे
उद्घाटन व पारितोषक वितरण समारंभ गाडगीळ कुटुंबियांच्या हस्त करण्यात आले. स्पर्धा अतिशय चुरशीची झाली
व अंतिम फेरीत ब्रेक टू फिनिश करून श्री. अमृत परदेशी यांनी विजेतेपद पटकाविले तर रझाक शेख हे उपविजेते
झाले. स्पर्धेसाठी एकूण १० हजार रुपयांची रोख पारितोषिके पहिल्या चार क्रमांकास देण्यात आली. प्रत्येक स्पर्धकास
सहभागाबद्दल पदक देण्यात आले. तसेच ह्या स्पर्धेचे आयोजन श्री.प्रदीप बारटक्के व श्री.विश्वास रिसवडकर यांनी
केले होते. त्यांच्यासह गावजनार्दन कॅरम क्लबतर्फे विजेत्यास स्मृतीचिन्ह देेण्यात आले. माननीय नगर सेवक
श्री.बोडके ह्यांनी पण स्मृतीचिन्ह दिले. स्पर्धेच्या सर्व स्मृतीचिन्हांचा खर्च गाडगीळ कुटुंबियांनी केला होता.
सुवर्ण महोत्सवी समारंभाची सांगता दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ ह्या वेळेत विशेष
समारंभाने झाली. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे आधीच्या वर्गातील माजी विद्यार्थी श्री.प्रवीण दिक्षित, निवृत्त
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य हे लाभले होते. त्यांनी आपल्या भाषणात वरिष्ठ नागरिकांनी सध्याच्या काळात
आपल्या ठेवींची फसवणूक न होण्याकरिता घ्यावयाची खबरदारी व इतर अनेक डिजीटल सुरक्षेततेबद्दल उपाय
ह्याबद्दल प्रबोधन केले.तसेच शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून प्रदीर्घ अनुभवाचा फायदा सध्याच्या शालेय
विद्यार्थ्यांना व्याख्यानमालेतून द्यावा अशी कल्पना मांडली. समारंभामध्ये प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पदक देवून
सन्मान करण्यात आला. तसेच वरील सर्व उपक्रमांसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या वर्गणी व्यतिरिक्त
दिलेल्या देणगीदारांचे विशेष सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. त्यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी श्री.अतुल
तुळपुळे ह्यांनी सुरेख व्हायोलिन वादन सादर केले व श्री.अरविंद परांजपे ह्यांनी तबला वादनाने सभागृह दणाणून
सोडले. तसेच इतर माजी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.
वरील कार्यक्रमास मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी काळे तसेच शाळा समिती अध्यक्ष श्री.कांबळे हे उपस्थित होते. तसेच शाळेची संस्था प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष श्री.गजानन एकबोटे व सचिव श्री.शामकांत देशमुख यांनी वरील मेळाव्यास शुभेच्छा दिल्या होत्या. वरील सर्व कार्यक्रमास शाळेतील ज्ञानेश्वर सभागृह व इतर सर्व आवार उपलब्ध करून दिले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक विद्या मंदिर मुख्याध्यापिका श्रीमती हगवणे, शिशु विद्या मंदिर मुख्याध्यापिका श्रीमती छाया दिक्षीत तसेच क्रिडाशिक्षक श्री.प्रमोद शिंदे व इतर कर्मचारी वर्ग ह्यांची मोलाची मदत झाली.
वरील सर्व कामाचे नियोजन व अंमलबजावणी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांतफे श्री.शशांक वाघ व श्री. विवेक देऊसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.