शबनम न्यूज : पुणे (दि.०३ मार्च) :- कृषी गणना विभागाचे उपसंचालक डॉ. जयंत टेकाळे यांचा सेवापूर्तीनिमित्त विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांच्या हस्ते कृषी आयुक्तालयात नुकताच सन्मान करण्यात आला.
यावेळी ‘आत्मा’ चे संचालक डॉ. दशरथ तांभाळे, मुख्य सांख्यिकी विनयकुमार आवटे, सहसंचालक रफिक नाईकवाडी, साखर सहसंचालक पांडुरंग शेळके तसेच कृषी खात्यातील कर्मचारी उपस्थित होते. शेतकरी ते कृषी खाते यांना आयुष्यभर केंद्रबिंदू मानत सचोटीने काम करणाऱ्या डॉ. टेकाळे यांनी कोणतेही काम कधीही प्रलंबित ठेवले नाही. त्यांनी पावणेदोन वर्ष केलेल्या कामामुळे राज्याने पीएम-किसान योजनेत अव्वल काम करीत केंद्राचा पुरस्कार मिळवला, अशा शब्दांत संचालक श्री. पाटील यांनी कौतुक केले.
डॉ.टेकाळे यांचा कार्य परिचय-
राज्याच्या कृषी खात्याला प्रयोगशील उपक्रमांमधून वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करणारे उपसंचालक म्हणून डॉ. जयंत टेकाळे परिचित आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पहिले राज्य अंमलबजावणी प्रमुख म्हणून डॉ. टेकाळे यांनी उत्तम काम केले. त्यामुळे राज्याच्या कामकाजाचा देशपातळीवर गौरव झाला होता.
‘पीएम-किसान’ योजनेची गेल्या तीन वर्षापासून ते जबाबदारी सांभाळत होते. डॉक्टरेट मिळवली होती तसेच कायद्याचीही पदवी त्यांनी प्राप्त केली होती. गुण नियंत्रण कायदे, गुण नियंत्रण प्रयोगशाळा व जैविक प्रयोगशाळा या विषयात त्यांचा अभ्यास होता. त्यांनी कायदा अधिकारी, सहाय्यक संचालक,साखर, कृषी उपसंचालक प्रयोगशाळा, कृषी उपसंचालक कृषी गणना अश्या विविध पदावर काम केले आहे. कृषी उपसंचालक प्रयोगशाळा या महत्वाच्या पदावर काम करताना त्यांच्या कालावधीत राज्यातील सर्व गुण नियंत्रण प्रयोगशाळा एन.ए.बी.एल. मानांकित करणे तसेच राज्यात प्रथमतः दहा जैविक प्रयोगशाळेत द्रवरूप जैविक खत consortia चे उत्पादन सुरू केले होते व या विक्री मधून राज्याला सात कोटी पर्यंत महसूल प्राप्त केला होता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाल्यापासून उपायुक्त तथा राज्य अंमलबजावणी कक्ष प्रमुख म्हणून योजनेची घडी बसवण्या करिता जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
सत्कारप्रसंगी डॉ. टेकाळे म्हणाले, कृषी खात्यात केलेल्या कामाबद्दल मी पूर्ण समाधानी असून काम करत असताना सर्वांकडून वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल तसेच सेवापूर्तीनिमित्त केलेल्या सन्मानाबद्दल ऋण व्यक्त करतो. निवृत्तीनंतरही शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी शक्य ती मदत करत राहील, असेही डॉ. टेकाळे म्हणाले. तसेच यावेळी कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीने संचालक विकास पाटील यांच्या हस्ते डॉ. टेकाळे यांना पुणेरी पगडी परिधान करुन गौरव करण्यात आला.