शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ मार्च) :- पुणे महामेट्रो प्रशासनाने वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते फुगेवाडी या दोन मार्गाचे काम पूर्ण केले. उद्या रविवारी (दि. 6) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेण्यात येणा-या उद्घाटनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बहिष्कार घालत आहे. असे मनसे शहरअध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले आहे.
कारण, पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे काम सुरू होत असताना मेट्रो निगडीपर्यंत करण्यात यावी, अशी मनसेची मागणी होती. त्यासाठी केंद्र सरकार व तत्कालीन राज्य सरकार व महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेने पिंपरी ते निगडी पर्यंत मेट्रोचा नव्याने ‘डीपीआर’ तयार केला. त्याला महासभेची मान्यता घेऊन तो ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. राज्य शासनाने मंजूर करून तो ठराव केंद्र सरकारकडे पाठविला. काही त्रुटी आढळल्यामुळे तो ठराव पुन्हा राज्य सरकारकडे परत आला. राज्य सरकारने सर्व त्रुटी दुरूस्त करून अंतिम मंजुरीसाठी तो ठराव पुन्हा केंद्राकडे पाठविला. केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी तो ठराव धुळखात पडला आहे. त्याला अंतिम मंजुरी न देता मोदीजी मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पुण्यात येत आहेत.
निगडीपर्यंत मेट्रो झाल्यानंतर चिंचवड, आकुर्डी, निगडी तसेच ग्रामीण भागात राहणा-या नागरिकांना सुध्दा त्याचा फायदा घेता येणार आहे. निगडीपर्यंत मेट्रो झालीच पाहिजे, ही मनसेची मागणी आहे.
निगडीपर्यंत मेट्रो करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. अधी विस्तारित मेट्रो करा मग उद्घाटने घ्या. उगाच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्यासाठी उद्घाटनाचा घाट घालू नका. पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाचे उद्घाटन घेऊन चिंचवड, आकुर्डी, निगडी परिसरात राहणा-या नागरिकांच्या रोषाला सामोरे जाऊ नका. कारण, लोकांना मेट्रोचा फायदा घेता आला पाहिजे. उद्या होणा-या मेट्रोच्या उद्घाटनावर मनसे बहिष्कार घालत आहे, याची नोंद घ्यावी. असे सचिन चिखले यांनी सांगितले आहे.