उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन?
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ मार्च) :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कारभारी अजित पवार प्रमुख अतिथी असलेल्या विविध कार्यक्रमांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कडवा विरोध केला आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांविरोधात आंदोलनाची जय्यत तयारी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन, समारंभ रविवारी, दि. ६ मार्च २०२२ रोजी दुपारी २ वाजलेपासून आयोजित केले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. किंबहुना तशी निमंत्रण पत्रिका महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषा उर्फ माई ढोरे, विशेष उपस्थिती आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या नावांचा उल्लेखही निमंत्रण पत्रिकेत केला आहे.
मात्र, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी भाजपा आणि महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. शहराध्यक्ष गव्हाणे यांनी तसा निरोप पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना पाठवला आहे. माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रोटोकॉलचा दाखला देत स्वत:चे अज्ञान पिंपरी-चिंचवडकरांसमोर मांडले आहे. निमंत्रण पत्रिकेत अजित पवार यांचा ‘‘प्रमुख अतिथी ’’ असा उल्लेख असतानाही वाघेरे कार्यक्रमाबाबत विरोधाची भूमिका घेताना दिसत आहे.
‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली. जे लोक विकासकामांबाबत बोलतात त्यांना लोक संधी देतात. वादामध्ये रस असलेले फार थोडे लोक असतात. मोदी ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. यावेळी त्यांचा मान-सन्मान राखायला हवा. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागाता जावू शकतात. हा त्यांचा अधिकार आहे आणि पालकमंत्री म्हणून मी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, असे जाहीरपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. याची संपूर्ण राज्यात चर्चा झाली.
मात्र, पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यातून बोध घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. दुपारच्या सत्रात विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केले आहे. असे असताना पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अजित पवारांच्या कार्यक्रमाविरोधात आंदोलन करणार आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, मोदींच्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे. ‘‘ अपूर्ण कामाचे उद्घाटन मोदी करत आहेत’’ असा दावा पवारांनी केला. त्यापूर्वी, अजित पवार यांनी मोदींच्या कामाचे कौतूक केले. आता पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी मोदी-फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यक्रमावर अप्रत्यक्ष बहिष्कार घाला, असे आवाहन करीत आहेत. त्यामुळे नेमके काय करायचे? असा संभ्रम राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांत निर्माण झाला आहे.