शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ मार्च) :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार (दि. ६ मार्च २०२२) रोजी भोसरी परिसरातील महिला भगिनींच्या मनोरंजनाकरीता भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा व गायत्री सखीमंच भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने सखुबाई गवळी उद्यान आळंदी रोड, भोसरी येथे सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर व कु. सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे, चिखली विधानसभेच्या विद्यमान आमदार श्वेता ताई महाले, सिनेअभिनेत्या अश्विनी महांगडे, प्रसिद्ध उद्योजक विनायक भोंगाळे, विद्यमान नगरसेवक सागर गवळी, प्रदीप बाबा लोंढे, सोनाली गव्हाणे, मोरेश्वर शेडगे, विजय भोसुरे, शैला मोळक, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस कविता भोंगाळे-कडू आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रसंगी भोसरी परिसरातील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
महिलांच्या कर्तृत्वाला वाव देण्याकरिता आमदार महेश लांडगे व शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे हे इंद्रायणी जत्रेच्या माध्यमातून व अन्य सामाजिक उपक्रमातून सतत कार्यरत असतात. त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून हेच आज आम्ही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भोसरी परिसरातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याकरिता व गृहणीच्या मनोरंजनाकरीता आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे यावेळी सौ कविता भोंगाळे-कडू यांनी सांगितले.
भोसरी विधानसभेतील आजचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोसरी परिसरात सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक व प्रामुख्याने स्त्री सबलीकरणाच्या माध्यमातून कविता भोंगाळे-कडू यांनी विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनातून केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची कार्यतत्परता आगामी काळात ही अशीच राहील, असे मत यावेळी आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले.
आपल्या प्रभागात पाणी, रस्ता, ड्रेनेज या मूलभूत नागरी सुविधा उत्तम रीतीने उपलब्ध करून देणे हे प्रत्येक नगरसेवकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र गत दोन वर्षात उद्भवलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी भोसरी परिसरात केलेल्या अत्यंत बहुमोल कार्यामुळे आपण आज हा कविताताईंनी महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतो, असे मत यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी व्यक्त केले.
सदर प्रसंगी सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांनी उपस्थित महिलांच्या मनोरंजनाकरीता घेतलेला छोटेखानी खेळात सहभागी होऊन महिलांनी भरघोस बक्षिसे जिंकली. तसेच विशेष प्राविण्यप्राप्त महिलांना मिक्सर, टीव्ही, कुलर अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले.