‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’चा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
शबनम न्यूज : पुणे (दि.१० मार्च) :- भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘भावांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार,१२ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष, महिला दिन अशा अनेक गोष्टींच्या निमित्ताने नृत्यवेध कथक नृत्य संस्थेच्या संस्थापिका डॉ. माधुरी आपटे आणि संस्थेच्या विद्यार्थिनी ‘कथक नृत्य भावांजली’ हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये सरस्वती वंदना,ताल झपताल,तराणा, दशावतार या कथक नृत्याधारित रचनांबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेली आणि लतादीदींचा स्वर्गीय स्वर लाभलेली शिवाजी महाराजांची आरती, तसेच भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या भावपूर्ण स्वरातील नामदेव महाराजांचा अभंग,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांवरील कविता, तसेच विलास पोतनीस रचित गणिताधारित काही नृत्य संरचना सादर होणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११२ वा कार्यक्रम आहे.प्रवेश कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून दिला जाईल .