शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ मार्च ) :- पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे गावातील भुयारी मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुलाखालील वाहतूक एकेरी करण्याची मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष नवनाथ ढवळे व पुनावळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. पुनावळे गाव हे विकसित होत असताना रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पुनावळे गावातील भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. सकाळी नोकरदार वर्ग तसेच शालेय विद्यार्थी व इतर नागरिक तसेच शेतकरी वर्ग हे या भुयारी मार्गा ने ये-जा करत असतात. तसेच मोठमोठी वाहने या मार्गाने मार्गस्थ होत असतात. त्यामुळे या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वेळेचा अपव्यय होत असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने हा भुयारी मार्ग एकेरी करण्याची मागणी पुनावळे ग्रामस्थांच्यावतीने वारंवार होत असताना भाजपचे शहर उपाध्यक्ष नवनाथ ढवळे यांनी वाहतूक विभागाला या मागणीचे निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, आपल्या वाहतूक हद्दीमधील पूनावळे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा भुयारी मार्ग आहे. सदर भुयारी मार्ग खालील बाजूस रोज वाहतूक कोंडी होत आहे. सदर ठिकाणी आपल्या विभागामार्फत कर्मचारी सुद्धा उपस्थित असतात. परंतु भुयारी मार्ग लहान असल्याने व खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असल्यामुळे रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तरी सदर ठिकाणी वाहतुकीमध्ये काही बदल केल्यास वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण कमी होईल तरी आपण काही मार्ग एकतर्फी करावे तसेच काही मार्गामध्ये बदल करावा, असेही सदर निवेदनात नवनाथ ढवळे यांनी नमूद केले आहे.