शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२२ मार्च ) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी २० ते २५ वर्षे ज्यांचे निष्ठेने काम केले. सतरंजा उचलल्या अशा ज्येष्ठ नगरसेवकांनी आता निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी दबक्या आवाजात जोर धरू लागली आहे. महापालिका सभागृहात भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना असे सर्वपक्षीय मिळून सुमारे ३० ते ३५ नगरसेवकांनी तीन-चार टर्म नगरसेवकपद भूषवले आहे. तसेच, काही ज्येष्ठांनी तर चार-पाच टर्म कार्यकाळ गाजवला आहे.
महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारुढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरही काही ज्येष्ठांनी वरचष्मा ठेवला आहे. मात्र, अशाच माजी दिग्गजांच्या साम्राज्यात निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आपल्याला कधी संधी मिळणार? या प्रतीक्षेत आहेत. २०१७ मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेक नवोदितांना संधी मिळाली. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे पुरेसे उमेदवार नव्हते. राष्ट्रवादीत किमान २० आणि भाजपातही १५ नगरसेवक असे आहेत की ज्यांनी तीन-चार टर्म सत्ता गाजवली आहे.
विधानसभा सदस्य किंवा संसद सदस्य अर्थात आमदार- खासदार असल्यास आपल्या कार्यकर्त्यांना नगसेवक, पदाधिकारी बनवण्याची संधी असते. मात्र, नगरसेवकपद भूषवणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्या समर्थक, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही. परिणामी, राजकीय महत्त्वाकांक्षेतून ज्येष्ठांशी जोडलेले कार्यकर्ते स्वत: तयारीला लागतात. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून विद्यमानांना संधी दिली जाते. त्यामुळे अपेक्षा असतानाही गुणवंत नवोदितांना संधी मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांनी स्वत:हून नगसेवकपदाची खूर्ची खाली करावी, असा विचार पिंपरी-चिंचवडमध्ये जोर धरू लागला आहे.
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विचार केला असता पाच टर्म पूर्ण झालेले सर्वांत ज्येष्ठ योगेश बहल यांचा पहिला क्रमांक लागतो. ३० वर्षे बहल नगसेवक, महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारुढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता म्हणून काम करीत आहेत. त्यानंतर चार टर्म झालेल्या मंगला कदम, अजित गव्हाणे यांच्याही नावाचा विचार पक्षश्रेष्ठींनी करावा, असा दबक्या आवाजातला सूर आहे. तसेच, सलग चारवेळा निवडून आलेले आणि पाचव्यावेळी स्वीकृत असलेल्या भाऊसाहेब भोईर, सलग तीन टर्म पूर्ण झालेल्या सीमा सावळे, उषा वाघेरे, अपर्णा डोके, जयश्री गावडे, डब्बू आसवाणी, संतोष लोंढे, विलास मडिगेरी अशी अनेक नावे आहेत.
तीन-चार, पाच टर्म म्हणजे १० ते २५ वर्षांत त्याच- त्या प्रभागात नेतृत्व करणाऱ्या माजी नगरसेवकांनी पुन्हा त्याच प्रभागातील नागरिकांसाठी विकासकामांसाठी मते मागण्याची तयारी केल्यास मतदारांनी आपल्याला दारात का उभा करावे? असा सवाल निष्ठावंतांकडून उपस्थित केला आहे. तसेच, ज्येष्ठांनी आता जागा खाली करावी आणि कार्यकर्त्यांना, निष्ठावंतांना संधी द्यावी, असा अंडरकरंट सांप्रतला पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात दिसत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील माजी महापौर आर.एस. कुमार यांनी सर्वाधिक काळ महापालिका सभागृहात असलेला लोकप्रतिनिधी म्हणून मान मिळवला. मात्र, अगदी नवख्या अमित गावडे यांनी त्यांचा पराभव केला, ही वस्तुस्थिती लक्षात घेणे अपेक्षीत आहे. कारण, तीन-चार टर्म असलेल्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी केवळ झेंडे लावून प्रचार करायचा का? राजकीय सतरंजा उचलायच्या का? असा प्रश्न आहे. दुसरीकडे ज्येष्ठांनी आता आपल्या राजकीय वारसदारांना ‘लाँच’ करायचे आहे? त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा २० ते २५ वर्षे घराणेशाहीचे पाईक व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठांनो आता थांबा आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.