शबनम न्यूज : पुणे (दि.२९ मार्च) :- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा साताऱ्याला मिळालं आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. अशातच यंदा या स्पर्धेचं आयोजनामुळं राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे. साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा खेळवण्यात येईल.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरूवात 1961 साली झाली. हा मानाचा किताब आतापर्यंत अनेक जणांनी पटकावला आहे. आपल्या देशात कुस्तीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. गेल्या दोन वर्षात अनेकदा होणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेक जत्रा, यात्रा, उरूस रद्द झाले. त्यामुळे कुस्तीप्रेमींच्या आनंदावर विर्जन पडलं. तसेच मल्लानाही मोकळीपणाने दंड थोपटता आले नाहीत. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा दंड कडाडणार आहेत. पुन्हा मैदान गाजणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांना आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर महाराष्ट्र केसरीची गदा मात्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याच हस्ते देण्यात येणार आहे.