शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३० मार्च) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव, आळंदी (पुणे) या ठिकाणी ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने “नवीन मतदार नाव नोंदणी प्रक्रिया आणि मतदार जनजागृती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पाहुण्यांचा परिचय कला शाखा प्रमुख प्रा.कैलासअस्तकर यांनी करून दिला.या प्रसंगी मा. श्री. हरिभाऊ साबळे, समन्वयक- भोसरी मतदारसंघ, यांनी नवीन मतदार नाव नोंदणी प्रक्रिया बाबत सविस्तर मार्गदर्शन करीत नाव नोंदणी करताना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय तसेच नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारे विविध कागदपत्रे यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मा. श्री. सुरेश पिसाळ नायब तहसीलदार- भोसरी मतदार संघ यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सध्याच्या काळात मतदारांमध्ये जनजागृती किती महत्वाची आहे. याबाबत विवेचन करीत मतदानाच्या बाबतीत असलेली उदासीनता तरुण वर्गाने घालण्याची गरज व्यक्त करीत तृतीयपंथी मतदारांसाठी निवडणूक आयोगाने दिलेली सूट व त्यांच्यातील मतदान जागृती याबाबत विवेचन करीत मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी जनजागृती संदर्भातील लिंकबाबत माहिती सांगितली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हंसराज थोरात यांनी भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून लोकशाही जिवंत ठेवणे म्हणजे मतदान करणे होय असे मत व्यक्त करीत मतदान करताना मतदारांनी घ्यावयाची काळजी, तसेच आधुनिक काळात डिजिटल दुनियेत केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर नसून संगणकीय ज्ञान म्हणजे साक्षर होय असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मा. श्री मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रणजित कदम यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. कैलास अस्तरकर यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचे आभार प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्रा.डॉ. पांडुरंग मिसाळ , प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब ,प्रा. डॉ. राजू शिरसकर, प्रा. शाहूराज येवते, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. भालचंद्र भोसले, प्रा. डॉ. छाया जोशी, प्रा. शैला वाळुंज, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा. प्रेरणा पाटील प्रा. सोनाली अभंग, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा.करिष्मा सातपुते इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक व महाविद्यालयातील कला,वाणिज्य आणि बी.बी.ए.( सी. ए. ) शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.