शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ एप्रिल) :- सुंदर हस्ताक्षर अशी शहराला ओळख असलेले पिंपरीगावातील वयोवृद्ध बाळासाहेब महादू वाघेरे यांनी हाताने संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून महाराष्ट्रात अनोखा विक्रम केला .
२ डिसेंबर २०२१ रोजी ज्ञानेश्वरी लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली होती . वारकरी संप्रदाय व धार्मिक पार्श्वभूमी असलेले ७३ वर्षीय संतसेवक बाळासाहेब वाघेरे यांचे लहानपणापासूनच वळणदार व सुंदर हस्ताक्षर होते.
या छंदरूपी उपक्रमासाठी फुलस्केपची १२०० पाने ज्ञानेश्वरी लिहिण्यास त्यांना लागली. त्यांनी केलेल्या या असामान्य कामगिरीबद्दल मावळमधील नामवंत पैलवान चंद्रकांत सातकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच स्मृतिचिन्ह देऊन व पिंपरी गावातील सर्व वाघेरे परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. पै. संभाजी राक्षे , संजोग वाघेरे, दत्तात्रय वाघेरे , प्रभाकर वाघेरे , पै. विजय नखाते , संदीप वाघेरे,सतिश महाराज गव्हाणे , प्रबोधनकार शारदाताई मुंढे ,आदी यावेळी उपिस्थत होते.
कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक हनुमंत वाघेरे यांनी केले होते. लवकरच भंडारा डोंगरावर बसून ‘तुकाराम गाथा’ हाताने लिहिणार असल्याच्या संकल्प संतसेवक वाघेरे यांनी यावेळी केला .