शबनम न्यूज : पुणे (दि.०७ एप्रिल) :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने कोथरूड परिसरात बॅनर लागले आहेत. त्या बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहिण्यात आली आहे. हे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवर, ‘ पुणे शहरातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. कुणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा’ अशा स्वरूपाचा आशय लिहला आहे. या बॅनरमुळे शहरात विविध चर्चांना उधान आले आहे.
तर दुसऱ्या एका फ्लेक्सवर, दादा परत या असं लिहलं आहे. त्यानंतर त्यामध्ये, ‘ दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाहीये. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय!’ असं लिहण्यात आले आहे. त्याखाली समस्त कोथरूडकरांची विनंती असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील काही नागरिकांनी चंद्रकांत पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात फिरकले नाहीयेत, असा आरोप केला आहे. पाटील स्वत:च्याच कोथरूड मतदार संघातून गायब आहेत, कित्येक दिवस आमदार मतदार संघात सक्रिय न दिसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. आमदारचं मतदार संघात नसल्याने आपल्या समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडलाय. त्यामुळे कोथरूड परिसरात ‘दादा परत या’ अशा स्वरूपाचे फ्लेक्स लागल्याचे दिसत आहेत. मात्र हे बॅनर्स कोणी लावलेत याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.