वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.१३ एप्रिल) :- राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्यानंतर माध्यमांना मुंडे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
‘धनंजय मुंडे यांना दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. एमआयआरसह इतर तपासण्या करण्यात येत आहेत. मुंडे हे काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पक्ष कार्यालयात होते. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या कुटुंब त्यांच्यासोबत असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त पसरल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच काही कार्यकर्ते धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे. डॉक्टरांनी सध्या मुंडे यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुंबईत न येता जिथे आहेत तिथूनच त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असं अजित पवार म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विटरवरुन धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. “राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे,” असं टोपे यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इ. मुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे.@dhananjay_munde @NCPspeaks
Advertisement— Rajesh Tope (@rajeshtope11) April 13, 2022