पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी व ब क्षेत्रिय कार्यालयाचा उपक्रम
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर बनविणे व प्रत्येक घरापर्यंत स्वच्छाग्रह उपक्रम पोहोचविण्याच्या उददेशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृती करीता प्लॉगेथॉन मोहिम हाती घेण्यात आली आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी व ब क्षेत्रिय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने जुना जकात नाका संत नामदेव महाराज चौक ते राजयोग पेट्रोल पंप, वाल्हेकरवाडी या परिसरात “प्लॉगेथॉन 2022” मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज गुरुवार, दि. 14 एप्रिल 2022 रोजी पार पडलेल्या या मोहिमेत प्लास्टिक कचरा संकलित करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नीळकंठ पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपक्रमात आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य निरीक्षक एम. एम. शिंदे, ऑल इंडिया गव्हर्नन्स इन्स्टीट्युटचे रामहरी साठे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व स्मार्ट सारथी टीमने सहभाग नोंदविला. जुना जकात नाका पासून सुरुवात होवून राजयोग पेट्रोल पंप, वाल्हेकरवाडी याठिकाणी प्लॉगेथॉनचा समारोप झाला. प्लॉगेथॉन मोहिम शहरातील ३२ प्रभागामध्ये राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहराला देशातील स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच संलग्न संस्थांनी पुढाकार घेतला आहे. नागरी सहभाग वाढावा, यासाठी संस्था , मंडळे, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, विद्यार्थी, बचत गट , पर्यावरणप्रेमी आणि स्वच्छतेबद्दल जागृत असलेल्या व्यक्तींना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येत आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी आपले योगदान देणे गरजेचे असल्याचे श्री. नीळकंठ पोमण यावेळी म्हणाले.