शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल) :- स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी निमित्त, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्य कला मंदिर यांच्या वतीने ‘नृत्योत्सव 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा नृत्योत्सव 14 ते 29 एप्रिल या कालावधीत होणार आहे. गुरुवारी (दि. 14) निगडी येथे नृत्योत्सवाला सिने नाट्य सृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली.
नृत्य कला मंदिर या संस्थेला 25 वर्ष झाली आहे. त्यानिमित्त संस्था रजत महोत्सव साजरा करत आहे. नृत्य कला मंदिरच्या संस्थापिका तेजश्री अडीगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यासाठी नृत्यतेज अकादमी आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांनी सहकार्य केले आहे.
निगडी येथील मनोहर वाडोकर सभागृहात नृत्योत्सवाची सुरुवात झाली. नृत्योत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध लोकनाट्य आणि टीव्ही कलाकार जयमाला इनामदार, ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार वसंत अवसरीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अभिनेत्री अश्विनी मुकादम, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष दीपक बाळसराफ, अल्मेडा फाउंडेशन गोवाच्या अध्यक्षा, नृत्यांगना आणि योगा अभ्यासक सचिका अल्मेडा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी नृत्य कला मंदिर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तेजश्री अडीगे, वाय वाय रत्नम, संतोष साखरे, वैभव घरत, मनाली गोवंडे आदी उपस्थित होते.
‘कला शिकली पाहिजे आणि कला जोपासली पाहिजे’, असा मोलाचा सल्ला वसंत अवसरीकर यांनी यावेळी बोलताना दिला.
अभिनेत्री आणि नृत्यांगना जयमाला इनामदार म्हणाल्या, “तेजश्री अडीगे यांचा नृत्य क्षेत्रातील प्रवास प्रेरणादायी आहे. मला लहान होऊन तेजश्रीकडे नृत्य शिकावं वाटत आहे. तेजश्री यांनी कोरोना काळात लोककलावंतांना त्यांच्या पालावर जाऊन मदत केली. याचा अभिमान वाटत असल्याचेही इनामदार यांनी सांगितले.
संचिता अल्मेडा यांनी ‘नृत्यातून जगण्याचा आनंद घेता येतो. नृत्य ही जगण्याची कला आहे. नृत्यातून ईश्वराशी समारुप होता येतं असे सांगितले.
14 ते 29 एप्रिल दरम्यान दररोज दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत नृत्य कार्यशाळा होणार आहे. 28 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे ‘भारत मेरा रंग रंगीला’ हा डान्स ड्रामा होणार आहे. नृत्य कला मंदिर संस्थेच्या विद्यार्थिनी याचे सादरीकरण करतील. अभिनेता, झी एकापेक्षा एकचा महाविजेता, सेलिब्रिटी कोरिओग्राफर मयुरेश पेम कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करणार आहे. तसेच तो नृत्य कला मंदिरच्या ‘भारत मेरा रंग रंगीला’ या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन देखील करणार आहे. मयुरेश हा नृत्य कला मंदिरचा माजी विद्यार्थी आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांना नृत्य शिकण्याची ही चांगली संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. 29 एप्रिल रोजी ‘शास्त्रीय नृत्य दिग्दर्शन फेस्टिवल’ पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, पुणे येथे होणार आहे.
इशस्तवनाने नृत्योत्सव 2022च्या उदघाटन सोहळ्याची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी लावणी, शास्त्रीय आणि अन्य प्रकारची नृत्ये सादर केली. तेजश्री अडीगे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचा आजवरचा प्रवास त्यांनी प्रस्ताविकातून उलगडला. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.