शबनम न्यूज : पुणे (दि.१८ एप्रिल) :- भाविकांकडून केले जाणारे नामस्मरण… येशूची भक्तिगीते गाण्यात तल्लीन झालेले युवक, युवती… चर्चमधील प्रार्थना आणि प्रवचनानंतर एकमेकांना हॅपी ईस्टर म्हणत शुभेच्छा देणारे ख्रिस्त बांधव… केकचे वाटप .. अशा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात रविवारी ख्रिस्त बांधवांनी पुणे कॅम्पमधील मराठी मेथडिस्ट चर्चमध्ये पुनरूत्थानाचा दिवस म्हणजेच ईस्टर संडे साजरा केला.
या सणानिमित्त सुरू असलेले पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाचीही रविवारी सांगता झाली.
पवित्र वधस्तंभावर आपले प्राणार्पण केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाले. त्याची आठवण आणि येशूने मरणावर विजय मिळविला त्यानिमित्त ईस्टर संडे साजरा केला जातो. पुण्यात मेथडिस्ट मराठी चर्च पहाटेपासून भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
रेव्हरंड चंद्रशेखर जाधव यांनी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची कथा भाविकांना सांगितली. उपासनेसाठी चर्चमध्ये सभासद, महिला मंडळ, तरुण संघ सहभागी झाले होते, अशी रेव्हरंड चंद्रशेखर जाधव, मार्कस देशमुख यांनी दिली.सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. ‘ प्रभू येशूची कृपा सर्वांवर आहे. ती व्यर्थ घालवू नये, सदुपयोगात आणावी, ‘ असा संदेश रेव्हरंड चंद्रशेखर जाधव यांनी दिला.