विभागाची परवानगी न घेताच अनामत रक्कम खर्च केली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० एप्रिल) :- महाराष्ट्रातील ५४ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना परत न केलेली एकूण अनामत रक्कम – १४,३७,९४,३९४/- (१४ कोटी ३७ लाख रु.) आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून काही रक्कम तारण अनामत रक्कम (Refundable Deposit) घेतली जाते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयातून बाहेर पडतो, त्यावेळी ही रक्कम त्या विद्यार्थ्याना तात्काळ परत देणे अपेक्षित आहे. काही वेळा विद्यार्थ्याना ही रक्कम परत दिली जात नसल्यामुळे ती महाविद्यालयाकडे पडून राहते. त्या रक्कमेचा विनियोग गरजू इबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करणे आवश्यक आहे.
इबीसी विद्यार्थी पैसे अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना खालील प्रमाणे आर्थिक सहकार्य करणे अपेक्षित आहे.
१) वसतिगृह व मेस फी २) शैक्षणिक साहित्य – वह्या, पुस्तके, दफ्तर इ. ३) वैद्यकीय सुविधा ४) कमवा व शिका योजनेसाठी निधी उपलब्ध करणे. या ४ घटकावर एकूण अनामत रक्कमेच्या (Refundable Deposit) ३० टक्के रक्कम इबीसी विद्यार्थ्यासाठी खर्च करण्याबाबतचे परिपत्रक तात्काळ काढून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी केली आहे. अनेक महाविद्यालयांनी सहसंचालक विभागाची परवानगी न घेताच अनामत रक्कम खर्च केली असल्याची माहिती माहिती अधिकारातून मिळाली आहे. तसेच शिल्लक अनामत रक्कम अनुदान निर्धारणाच्या वेळी उत्पन्नाची बाब म्हणून विचारात घेऊन ती वेतनेतर अनुदानातून वजा करून अनुदान अदा करण्यात येईल. व शिल्लक अनामत रक्कमेचा तपशील वेतन देयक सादर करताना सादर करण्याचे परिपत्रक सहसंचालक विभागाने काढले होते, मात्र त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीच नाही. अनेक महाविद्यालयांनी शिल्लक अनामत रक्कमेचा तपशील वेतन देयक सादर करताना केलाच नाही. या अनामत रक्क्मेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी एकूण अनामत रक्कमेच्या (Refundable Deposit) ३० टक्के रक्कम इबीसी विद्यार्थ्यासाठी खर्च करण्याबाबतचे परिपत्रक तात्काळ काढून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी केली आहे.