माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा मनपा आयुक्तांना सवाल
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ एप्रिल ) :- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 28 मधील पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत या भागातील माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मनपा आयुक्तांना जाब विचारला आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभागात सद्यस्थितीत अनियमित पाणीपुरवठा बाबत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रभागात साधारणतः ७० हजार ते ८० हजार नागरी वस्ती असून यामध्ये साधारण १५० पेक्षा जास्त सोसायटी व उर्वरित बैठी घरे आहेत. सदर सोसायट्यांना होणारा पाणीपुरवठा हे त्यांच्या गरजेपेक्षा ३० ते ४० टक्के येथे कमी आहे. आणि महानगर पालिका विभागा वतीने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो एवढ्या अपुऱ्या आणि कमी दाबाने मिळणारे पाणी दोन दिवस संपूर्ण सोसायटीला वापरण्यास मुबलक नाही, याबाबत आयुक्तांनी गंभीरपणे विचार करावा तसेच साधारण पाचशे व त्यापेक्षा जास्त सदनिका असलेल्या सोसायट्यांना दररोज दहा ते वीस टँकर्स पाण्याचे मागवावे लागतात त्यांचा दरमहा त्यांना लाखो रुपये खर्च करावा लागतो याला कारणीभूत कोण ? असाही सवाल माजी नगर सदस्य शत्रुघ्न काटे यांनी मनपा आयुक्तांना केला आहे तसेच प्रभाग क्रमांक 28 मधील परिसरात असणाऱ्या नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा अशीही मागणी केली आहे.