‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’चा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
शबनम न्यूज : पुणे (दि.२५ एप्रिल) :- आकार, पुणे प्रस्तुत , “रागमाला..एक रत्नमाला ” कथा आणि बंदीशीतून शनिवारी सायंकाळी मेधावीचा राजपुत्र आणि कुंडलगडची राजकन्या यांच्या विरहा पासून मिलनापर्यंतचा प्रवास उलगडला !
या रागमालेची कथा गोरज मुहूर्ता पासून गोपाल मुहूर्ता पर्यंतच्या कालावधीत उलगडते ! मुलतानी ते भैरवीतील छोटया बंदिशी मधून नायक – नायिकेच्या प्रथम भेटीपासून मिलनापर्यंतचा प्रवास या कार्यक्रमाद्वारे सादर करण्यात आला.
शास्त्रीय संगीतात प्रत्येक रागाला विशिष्ट वेळ असते. त्यानुसार तेरा रागांच्या छोट्या बंदिशी या कार्यक्रमात सादर झाल्या. मुलतानी, मारवा, परमेश्वरी,यमन, बागेश्री, मारूबिहाग, जयजयवंती, दरबारी, जोग, बैरागी भैरव, बिलासखानी, भैरवी या रांगांचा यामध्ये अंतर्भाव होता.
संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन – महेश पाटणकर यांचे होते. गायक कलाकार महेश पाटणकर, भाग्यश्री कुलकर्णी हे होते. अजित बेलवलकर ( सरोद ), अपूर्व गोखले वेधा पोळ ( व्हायोलिन ),माधवी करंदीकर (संवादिनी ), जितेंद्र पावगी, यशवंत देशपांडे (तबला ), प्राची देशपांडे यांनी निवेदन केले. संवाद लेखन प्रशांत कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी यांचे होते.राजपुत्र धैर्यसेनच्या भूमिकेत प्रशांत कुलकर्णी तर राजकन्या मृगनयनीच्या भूमिकेत अश्विनी कुलकर्णी या होत्या.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. सर्व कलाकारांचा ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शनिवार, २३एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११९ वा कार्यक्रम होता.