नृत्य कलामंदिरच्या विद्यार्थ्यांना सिने सृष्टीतील कलाकार देणार साथ
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ एप्रिल) :- नृत्य कलामंदिर संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेसहा वाजता रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे होणा-या ‘भारत मेरा रंग रंगीला’ या कार्यक्रमात नृत्य कलामंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांना सिने आणि नाट्य सृष्टीतील कलाकार नृत्यासाठी साथ करणार आहेत.
नृत्य कलामंदिर संस्थेच्या संस्थापिका तेजश्री अडीगे यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या ‘भारत मेरा रंग रंगीला’ या कार्यक्रमात अभिनेता, झी एकापेक्षा एकचा महाविजेता मयुरेश पेम, अभिनेत्री अश्विनी मुकादम, अभिनेता मनमीत पेम हे कलाकार नृत्य कलामंदिरच्या विद्यार्थ्यांसोबत नृत्य सादर करणार आहेत.
कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे आगामी प्रांतीय गव्हर्नर ला. राजेश कोठावडे, आगामी प्रांतीय गव्हर्नर 2 ला. सुनिल चेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी आणि जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्य कला मंदिर संस्थेच्या वतीने ‘नृत्योत्सव 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा नृत्योत्सव 14 ते 29 एप्रिल या कालावधीत होत असून गुरुवारी (दि. 28) पिंपरी-चिंचवडमधील रसिकांना यानिमित्ताने खास मेजवानी मिळणार आहे.
नृत्य कलामंदिर संस्थेच्या ज्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे, अशा विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मनाली कानेटकर, वैभव घरत, सिद्धी कटारिया, कुमिदिनी पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.